महाराष्ट्रातील ४ जागांबाबत निर्णय लवकरच – शरद पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचं सूत्र जवळपास निश्चित झालं असलं तरी अहमदनगरसह इतर तीन ठिकाणी घोडं अडलेलं दिसतंय. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादीकडूनही या जागेसाठी रस्सीखेच चालूच आहे. मात्र, महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४४ जागांबाबत तोडगा निघाला आहे. अन्य ४ जागांबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. गुजरातमधील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केल आहे.

दरम्यान, आम्ही महाआघाडीसाठी प्रत्येक राज्यात एका मजबूत पक्षाच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. तामिळनाडूत डीएमके, आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टी आणि पश्चिम बंगामध्ये तृणमूल काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी इतर पक्षांनी या प्रादेशिक पक्षांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे, असेही पवार यांनी नमूद केले आहे.