उद्धव ठाकरेंनी उभा केलेल्या शेतकऱ्याचे कर्ज आधीच माफ; शिवसेना-भाजप नवीन वादाला तोंड

मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बीडच्या जाहीर सभेत एका शेतकऱ्याला उभा करून “तुझी कर्जमाफी झाली का”? असा प्रश्न विचारला होता, त्यावर त्या शेतकऱ्यानं नाही असं उत्तर दिले होते. परंतु सभेत शेतकर्‍याला उभे केले होते, त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर २०१८  मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. त्यामुळे आता शिवसेना-भाजप वादाला तोंड फुटले आहे. यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

उद्धव ठाकरेंची बीडमध्ये जाहीर सभा चालू होती. त्या भर सभेत सभेत एका शेतकऱ्याला उभा करून “तुझी कर्जमाफी झाली का”? असा प्रश्न विचारला होता, त्यावर त्या शेतकऱ्यानं नाही असं उत्तर दिले होते. त्यावरून ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बीड येथील त्या शेतकर्‍याची संपूर्ण माहिती दिली आहे. त्याचे  नाव बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असून, त्यांचे कर्ज खाते क्रमांक 33817369657 असे आहे. हे स्टेट बँकेतील खाते असून, त्यांनी २०१४  मध्ये कर्ज घेतले होते. पुढे हे खाते एनपीए झाले. एनपीए खात्यांसंदर्भात काय करायचे, याचा निर्णय राज्यस्तरिय बँकर्स समितीत आधीच घेण्यात आला आहे. त्यानुसार, पूर्णपणे बुडित निघालेल्या खात्याला पुनरूज्जीवित करण्यासाठी सरकारने किती योगदान द्यायचे, याचे सूत्र त्यात ठरविण्यात आले.

त्यानुसार, या शेतकर्‍याचे 98,687 इतक्या रूपयाचे खाते एनपीए खाते पुन्हा त्या शेतकर्‍याला बँकिंग नेटवर्कमध्ये आणण्यासाठी 58,493 रूपयांचे योगदान शासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकर्‍याचे खाते पुन्हा नव्याने सुरू होऊ शकेल. शासनामार्फत ही रक्कम बँकेला जरी देण्यात आली असली तरी याच एनपीए अकाऊंटसंदर्भातील करारानुसार, शेतकर्‍याचे संपूर्ण 98,687 रूपये माफ झालेले आहे, असेही सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे हे काही विरोधी पक्षनेते नाहीत. ते आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनास आणून दिली असती, तर वरील संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्यापुढे आधीच आम्हाला मांडता आली असती, असेही सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता शिवसेना-भाजप वादाला तोंड फुटले आहे. यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.