fbpx

गुजरातचा धोका टळला, ‘वायू’ चक्रीवादळाने प्रवासाची दिशा बदलली

टीम महाराष्ट्र देशा : हवामान खात्याचा अंदाजानुसार ‘वायू’ चक्रीवादळाने अरबी समुद्रातून दिशा बदलून प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी गुजरातचा धोका टळला आहे. चक्रीवादळ हे गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास करत आहे. त्यामुळे मोठा धोका टळला असला तरी किनारी भागात समुद्राच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे गुजरातला सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.

‘वायू’ चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्याला उधाण आलं असून परिसरात साधारण ताशी १५५ ते १६५ किमी वेगानं वारे वाहात आहेत. वायू चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीला नसला तरी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून भारताच्या पश्चिम किनार पट्टीला ‘वायू’ चक्रीवादळचा धोका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मुंबई आणि गुजरातला सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला होता. तसेच काल मुंबईमध्ये ‘वायू’ चक्री वादळामुळे जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे मुंबईत चर्चगेट स्टेशनवरचं होर्डिंग कोसळलं आहे. यात ६२ वर्षांच्या मधुकर नार्वेकर यांचा मृत्यू झाला आहे.