मुलावर राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याला मारहाणीचा गुन्हा; सदाभाऊंकडून खुलासा, म्हणाले..

सांगली : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यावर जहरी टीका करत आहेत. एकेकाळचे घनिष्ट मित्र असलेले खोत आणि शेट्टी यांच्यातून सध्या विस्तवही जात नाहीये. एकमेकांवर टीका करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. मात्र, आता हा वाद थेट विकोपाला पाहायला मिळत आहे.

सदाभाऊंचा मुलगा तथा रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याला सोमवारी रात्री ९ च्या सुमारास बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. माने यांच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर सदाभाऊ खोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘या मारहाण प्रकरणात सागर हाणामारीच्या ठिकाणी नव्हताच. तो एका ठिकाणी जेवायला गेला होता. त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहे. स्वाभिमानीने नाहक राजकीय स्टंटबाजी करू नये’ असे सदाभाऊ खोत म्हणाले.

आमदार खोत म्हणाले, ‘तांबवे येथे जी घटना घडली त्याचे व्हिडिओ शुटिंग माझ्याकडे आहे. त्यात सागर कुठेही दिसत नाही. शिवाय, तो एका शालेय मित्रासोबत जेवायला गेला होता. त्याचेही शुटिंग आहे. तो या प्रकरणात सहभागी असता तर आम्ही थेट समोर आलो असतो, पाठ दाखवली नसती. त्यामुळे विनाकारण आरोप सहन करणार नाही. स्वाभिमानीने हा वाद घरगुती पातळीवर नेण्याचा नीच प्रकार करू नये.’

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही वाढवली. त्यात तयार ताटावर बसलेले काही लोक बडबड करत आव्हान देत आहेत. त्यांनी ही भाषा करू नये. आंदोलने आम्हाला नवीन नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा.राजकीय स्टंटबाजी करून काही होणार नाही. खोटे बोलण्याला काही मर्यादा असते’ असे म्हणत त्यांनी स्वाभिमानी संघटनेला थेट इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या