देशातील हिंसक घटनांना पंतप्रधान मोदींची मूकसंमती – दिग्विजय सिंग

narendra modi and digvijay singh

पुणे: हा देश सर्वांचा आहे, सर्व जातीधर्माचे लोक इथे एकत्र राहतात. पण आज लोकांमध्ये द्वेष निर्माण करून निष्पाप लोकांना मारण्याचे प्रकार होत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यावर काहीही बोलत नाहीत. त्यामुळे हिंसक  घटनांना त्यांची मूकसंमती आहे, असं वाटत असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभेत अविश्वास ठराव आल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, हा अविश्वास कोणाच्या विरोधात आहे. मात्र, सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी काय केलं हे सर्वांच्या समोर आहे. निवडणुकीत मोदींना देशातील 125 कोटी लोकांचं समर्थन मिळाल्याचं सांगितलं जातं, पण ते केवळ 31 टक्के मते घेत सत्तेवर आले असल्याचं यावेळी दिग्विजय सिंग म्हणाले .

ज्या मुरली मनोहर जोशींनी भाजपचा जाहीरनामा तयार केला, त्यांना लोकांनी विचारलं की या सरकारला किती मार्क देणार,  तर उत्तरपत्रिका पूर्ण रिकामी आहे, कोणतीही काम पूर्ण झाली नाहीत, मग मार्क काय देयचे हे भाजप नेतेच सांगत असल्याची टीका यावेळी सिंग यांनी केली.

शिवसेना सुरुवातीपासून भाजप सोबत निवडणूक लढवत आली आहे, मात्र अविश्वास ठरवावेळी त्यांनी भाजपला साथ दिली नाही, यशवंत सिन्हा, अरुण शौरी सारखे नेते मोदींवर नाराज आहेत. मागील चार वर्षात सरकारला 15 लाख रुपये अकाउंटला टाकता आलेले नाहीत, काळापैसा, शेतकरी समस्या सुटलेल्या  नाहीत, सर्वच प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही यावेळी सिंग यांनी केली.

राहुल गांधींनी मोदींची गळाभेट का घेतल्याचं विचारलं जातं,  पण भारतीय संस्कृतीमध्ये  कोणीही आपला विरोध केला तरी त्याची गळाभेट घेण्याची शिकवण असल्याचं दिग्विजय सिंग यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी काय बोलले यावर चर्चा होणं गरजेचं असताना गळाभेट आणि डोळा मारण्यावर चर्चा होते हे दुःखद असल्याचंही ते म्हणाले.