खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च राज्य सरकारने करावा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LAxman Jagtap and cm

चिंचवड : गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशात हाहाकार माजवला आहे. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. जम्बो कोव्हिड सेंटर्ससह सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागते.

खाजगी रुग्णालयांचा खर्च मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारा नसून कोरोना काळात आर्थिक फटका बसला असतानाच उपचाराचा आर्थिक बुर्दंड देखील सहन करावा लागत आहे. यामुळेच आता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च राज्य सरकारने करावा अशी मागणी केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र-

“ पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुर्दैव म्हणजे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी या महामारीचे संकट आहे तोपर्यंत सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करण्याबाबत मी स्वतः आपणाला वारंवार पत्र पाठवून सुचविले होते. खासगी रुग्णालयांमध्ये सामान्यांना कोरोनावर मोफत उपचार व आयसीयू बेड मिळावेत आणि सरकारी रुग्णालयांवर येणारा ताण कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, मी वारंवार पाठविलेल्या पत्रांकडे सरकार दरबारी दुर्लक्ष करण्यात आले, याची खंत वाटते.

सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील उपचार खर्च परवडत नाही. त्यामुळे हा सामान्य माणूस कोरोनाबाधित झाल्यानंतर सरकारी रुग्णालयांत दाखल होत आहे. ही संख्या खूप मोठी आहे. परंतु, सरकारी रुग्णालयात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. तेथे उपचारासाठी गेल्यानंतर आयसीयू बेडसाठी वाट बघावी लागते. बेड मिळत नसल्याने वेळेवर उपचार होत नाहीत आणि श्वास घेण्याचा त्रास व इतर आजार जास्त वाढत जातो. त्यातून आज आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

सरकारने खाजगी रूग्णालयांतील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढताना रुग्णाची खर्चिक बाजूही लक्षात घेणे तितकेच महत्वाचे होते. सामान्य रुग्णाला तेथील खर्च परवडणारा आहे का? याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.एकीकडे सरकार जम्बो कोविड सेंटर सुरु करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु, शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले डॉक्टर्स, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, सुविधा या सर्वांचे एकत्रीकरण केल्यास कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.

सरकारला वेगळे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याची गरज भासणार नाही. उपचारासाठी खासगी रुग्णालये उपलब्ध झाल्यास सरकारी रुग्णालयांवर येणार ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच आयसीयू बेड मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू प्रमाणावर नियंत्रण आणणे शक्य होईल. जर सर्व खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येणार नसेल, तर या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च सरकारमार्फत करण्यात यावा, जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांवर खर्चाचा आर्थिक बोजा येणार नाही आणि वेळेत उपचार होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल,” अशी मागणी लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

महत्वाच्या बातम्या:-