कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून पळाला आणि..

बीड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातून आज गुरुवारी सकाळी कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार समोर आला. मात्र, रुग्णालयातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांनी त्या रुग्णाचा दोन तासातच शोध घेऊन पुन्हा वॉर्डात भरती केले.

बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी भरती होण्याचा ओघ सुरूच आहे. यामुळे रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. सध्या स्वारातीच्या कोवीड वार्डात शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार सुरुये.

दरम्यान, आज गुरूवारी सकाळी या वार्डात भरती असलेला एक रुग्ण पळाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही गोष्ट माहिती झाल्यानंतर कोविड वार्डातील आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत या पळालेल्या रुग्णाचा शोध घेतला. तेंव्हा वार्डातून हा धूम ठोकणारा रुग्ण रुग्णालयाच्या मागच्या बाजूस आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी निश्वास सोडला. कोविड वार्डातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयातील रुग्णवाहिका बोलवून कीटचा वापर करीत त्या रुग्णास परत त्याच वार्डात भरती केले.