‘..यामुळे वीर सावरकरांबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे’, फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

पणजी : एका पुस्तक प्रकाशनावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे वाद चुकीचे आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते.

यावर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांना इतिहासाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करण्याची विकृती असून सावरकरांबाबत केलेले हे विधानही त्याच पद्धतीचे आहे. सावरकर यांनी राजनाथ सिंह यांना स्वप्नात येऊन ब्रिटिशांना माफीनामा का दिला हे सांगितले होते का?,’ असा बोचरा सवाल काँग्रेसने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी पणजी येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळात अनेकांचे अर्ज तयार केले होते. पण स्वत: केला नाही. त्यांना जेव्हा आग्रह झाला आणि सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी अर्ज केला. हा इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांत जास्त काळ आणि सर्वांत अडचणीच्या काळात सेल्युलर जेलमध्ये होते. खरी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या लोकांनी भोगली. त्यापैकी सावरकर एक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सावरकरांना भारतरत्न कधी देणार?
तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राजनाथ सिंह आणि मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘मोहन भागवतांनी नवीन काय सांगितलं? बाळसााहेब ठाकरेंनी वारंवार हेच सांगितलं आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचारच बाळासाहेबांचा आहे, असं सांगतानाच संघाने आता कोणत्या भूमिका घ्याव्यात आणि कधी घ्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका कायम तीच राहिली आहे. वीर सावरकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. म्हणून आजही सांगतो मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपला सावरकरांविषयी प्रेम आलंय तर त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांना भारतरत्न केव्हा देणार एवढेच विचारतो असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या