माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट, ‘थिंक टँक’ अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे

माओवादी समर्थक

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता असं सांगितलं. हजारो कागदपत्रे पाच माओवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पाचही माओवाद्यांवर केलेली कारवाई अत्यंत योग्य असून मोठ्या षडयंत्राचा पर्दाफार्श केल्याचा दावा त्यांनी केला.

माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, या नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. यावेळी माओवादी थिंक टँकच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडींमधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेले सर्वजण माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली. ही अटक अत्यंत योग्य होती परंतुतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही पोलीस महासंचालक परमवीर सिंग म्हणाले. तसेच भीमा-कोरेगाव दंगल आणि बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कम्प्यूटर्स आणि लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.Loading…
Loading...