पवारांच्या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली; भाजप नेत्याचा टोला

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मात्र, याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ममतादीदींच्या विजयासाठी अदृश्य हात काम करत होते, असा दावा केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडले. त्यामुळे मतविभागणी रोखली गेली. आणि त्याचा फटका भाजपला बसला. एकप्रकारे त्यांचे अदृश्य हात ममता बॅनर्जींच्या मदतीसाठी काम करत होते.’ असं विधान भाजप नेत्यानेच केल्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करून भाष्य केले होते.

आता यावर भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी भाष्य करताना शरद पवारांच्या अदृश्य हातामुळेच काँग्रेस भुईसपाट झाली असा खोचक टोला लगावला आहे. ‘जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्तींबद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली, असं सांगतानाच पंढरपूरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असं म्हणतात,’ असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचले आहेत.

आम्हाला पूर्ण विजय मिळाला नाही, पण…

पुढे ते म्हणाले, ‘भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही ममतादीदींना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हाला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे.’

महत्वाच्या बातम्या