कॉंग्रेसचे षड्यंत्र, लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहिली :रवीशंकर प्रसाद

टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सईद शुजा या सायबर हॅकरने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात आणि मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे भाजप पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधक मुंडे यांच्या मृत्यूबाबत ‘रॉ’ कडून चौकशी करा अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी देखील मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहल्याचा आरोप केला आहे.

सईद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने सोमवारी लंडन येथे पत्रकार परिषद घेवून भारतातील २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तसेच या सगळ्या प्रकाराची कल्पना असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचेही त्याने म्हटले होते. साहजिकच या खळबळ जनक माहितीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रवीशंकर प्रसाद यांनी लंडनमधील संपूर्ण कार्यक्रम काँग्रेस पुरस्कृत असल्याचे म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल काय करत होते? ते नेमके कशासाठी गेले होते? मला पूर्ण खात्री आहे की, काँग्रेस पुरस्कृत या कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठीच सिब्बल यांना पाठवण्यात आले होते. काँग्रेसच्या या कृतीमुळे देशातील जनतेने २०१४ साली दिलेल्या जनमताचा अपमान झाल्याची टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली.