वेतनवाढीसाठी आंदोलन केल्याच्या रागातून कंपनी मालकाने कर्मचाऱ्याला विष पाजले

बीड : बीड जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आष्टी तालुक्यातील एका कंपनीतील सर्व कामगारांचा पगार वाढावा अशी मागणी काही कर्मचाऱ्यांची होती. यासाठी एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या विरोधात आवाज उठवला. यामुळे कंपनीला पगारवाढ करावी लागली. मात्र, याचा राग मनात धरून त्या कर्मचाऱ्याला सतत त्रास देऊन कामावरून काढून टाकले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला विषारी औषध पाजून जिवे मारण्याच्या प्रयत्नही केला. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह चौघांवर अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संतोष गजानन आमले (वय ३५, रा. अंभोरा, ता. आष्टी) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष हा कॅनफॅक्स कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता. संतोष यांनी कंपनीतील कामगारांना पगारवाढ मिळावी यासाठी त्याने कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे कामगारांना पगारवाढ मिळाली.

मात्र, त्यानंतर कंपनीचा मालक सुभाष मुथा आणि इतर अधिकाऱ्यांनी संतोषला सतत त्रास दिला आणि खोटा आरोप करून त्याला कामावरून काढून टाकले. ३ सप्टेंबर सुभाष मुथाच्या सांगण्यावरून कट रचून कंपनीचे अधिकारी संदीप धोंडिबा सुरवसे, विकास विठ्ठल होले आणि बापुसाहेब सीताराम गायकवाड हे तिघे त्या ठिकाणी आले व संतोषला विषारी औषध जबरदस्तीने पाजले. नातेवाईकांनी संतोषला नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर संतोष याने कंपनी मालकाविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

महत्वाच्या बातम्या :