सौदी अरेबियाची एमार कंपनी राज्यात अन्न प्रक्रियेसाठी गुंतवणूक करणार – मुख्यमंत्री

दिल्लीत पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एमार (EMAAR) ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असून यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रियादेखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे दिली.

पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवासन, दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला, केंद्रीय दूरसंचार विभागाचे विशेष सचिव शिवा सेलम आणि एमआर उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मध्य-पूर्वेतील देशांमधील अन्न प्रक्रिया क्षेत्रात काम करणारी एमार ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या मध्य-पूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सूत्रावर या कंपनीचे सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. प्रधानमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार आज ही बैठक पार पडली. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत गुंतवणूक करण्यास कंपनीने रुची दाखविली असून या तिन्ही राज्यांत आवश्यक असणारी गुंतवणूक करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

फळे, भाज्या, अन्नधान्य आदींवर प्रक्रिया करून तयार केलेली उत्पादने मध्य-पूर्वेत पाठविण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या कंपनीचे पथक 03 मे रोजी मुंबईत येणार असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे वरिष्ठ अधिकारी इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणुकीच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाणार आहे. प्रकल्पाच्या गुंतवणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर करार करण्यात येईल.

नाशिकसारख्या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने फायदा होऊ शकणार असून आंबा, द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाज्या आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागात फूड पार्क उभारल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनांना शाश्वत भाव मिळण्यास त्याचा निश्चित फायदा होईल. तसेच अन्न धान्याच्या नासाडीचे प्रमाणही अत्यंत कमी होईल.