डोंगरी दुर्घटनेत कोसळली इमारत धोकादायक नव्हती : राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील संरक्षण भिंत कोसळण्याची घटना ताजी असताना मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेचा आढावा घेतला आहे.

या घटनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कोसळलेली इमारत ही म्हाडाची इमारत आहे मात्र, ती धोकादायक अवस्थेत नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. गृहनिर्माण खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. दुर्घटना झालेल्या इमारतीत १० ते १५ कुटुंब येथे राहत होती. त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ४० जण जखमी झाले असून १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या दुर्दैवी घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान डोंगरीतील बाबा गल्लीत चार मजली इमारत होती. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. यात ४० ते ५० जन अडकल्याची शक्यता आहे. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.