fbpx

नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची मोहिम सुरुच राहणार : जिल्हाधिकारी

The cleanliness campaign will continue till the river is completely clean: collector

अकोला: अकोला शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत (शनिवारी) आज हजारो लोकांनी मोर्णाची स्वच्छता केली. अनिकटच्या बाजुला लक्झरी बसस्टॉप जवळ (पूर्व भाग) आणि त्याच भागात दुसऱ्या बाजुला स्मशानभूमीच्या भागाकडून (पश्चिम भाग), या दोन्ही बाजुला स्वच्छतेचे काम करण्यात आले.

नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छते अंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि मनपा व पोलीस प्रशासनाने केले होते. त्यामुळे सहभागी सर्वांनीच कुठलीही भीती न बाळगता स्वयंस्फुर्तीने नदी काठावरील कचरा हिरीरीने ट्रॅक्टर व घंटागाडीत टाकला. मोर्णा स्वच्छ झालीच पाहिजे या भावनेतून सर्वजण मन लावून काम करताना दिसत होते. विशेष म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना न घडता ही मोहिम खूपच शिस्तबध्दपणे व शांततेने पार पडली.

नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेण्यात आली. काठावरील जलकुंभी ही सहभागी नागरिकांच्या मार्फत ट्रॅक्टर व घंटागाडीत भरण्यात आली. मोहिमेकरीता आवश्यक असणारी साधने व साहित्य मनपाकडून पुरविण्यात आले. यावेळी सर्पमित्र पथक, वैदयकीय सहायता पथक, पाणी व्यवस्थापन, साहित्य पुरवठा, जलकुंभी वाहतूक व्यवस्थापन ,नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर होते.
या मोहिमेत महापौर विजय अग्रवाल, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप पाटील, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, नगरसेवक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर सहभागी होते.

मोर्णाच्या स्वच्छतेसाठी लोकांनी आज दिलेला प्रतिसादही कौतुकास्पद होता. नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहिम सुरुच राहणार आहे. यापुढेही दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. जोपर्यंत नदी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत स्वच्छता मोहिम सुरुच राहणार
– जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय