सोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा

रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक जवळ येऊन ठेपल्याने प्रत्येक पक्षाकडून सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. युती झाल्यानंतर आरपीआय सोलापूर लोकसभेची जागा लढवणार असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरची जागा आरपीआयची असल्याचा दावा आता केला आहे. चिंचवड येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशनासाठी ते शहरात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या भाजपकडे असलेल्या या जागेवर आरपीआयने दावा केल्यामुळे सोलापुरमधील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचे बोलले जात आहे.नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याने भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.आता आरपीआयने या जागेवर दावा टाकल्याने भाजप गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.भाजप ही जागा आरपीआयसाठी सोडणार का हे लवकरच कळेल मात्र आठवले यांनी या जागेवर दावा करून सोलापूरच्या राजकारणात रंगत आणली आहे.

भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले, भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिंता नाही. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोन्ही खमके नेते आहेत. पाच वर्ष जरी ते सत्तेत राहून एकमेकांच्या विरोधात बोलत असले तरी योग्य वेळी दोन्ही नेते एकत्र येतील. युती झाल्यानंतर आरपीआय मुंबई, विदर्भातील रामटेक, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जागांवर लोकसभा निवडणूक लढणार आहे. साता-याचे उदयनराजे भोसले यांना जर राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तर त्यांना आरपीआय कडून तिकीट देऊन साता-याची देखील जागा आरपीआय लढणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1951 ते 2014 या कालावधीत एका पोटनिवडणुकीसह झालेल्या 17 निवडणुकांत तब्बल 12 वेळा या मतदार संघातून कॉंग्रेसचे खासदार झाले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. मोदी लाटेत भाजपचे अॅॅड. शरद बनसोडे यांचा अनपेक्षित विजय झाला होता.Loading…
Loading...