‘ज्या मुख्यमंत्र्यांची दररोज जात काढत होतात, त्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिले’, पंकजा मुंडेकडून फडणवीसांचे कौतुक

औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये भाजपाचा ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती असल्याचं खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आलं, ५० टक्क्यांच्या खालचं आरक्षणही संपुष्टात आलं अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. ज्या मुख्यमंत्र्यांची दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला, तर फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.

‘आता आपल्या राज्यात एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. ओबीसी, बहुजनांच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला तर कोणीतरी षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरतात. मात्र, मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम देखील याच सरकारने केले आहे. ज्या मुख्यमंत्र्यांची रोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण, ते आरक्षण देखील संपुष्टात आलं’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या