एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत…’

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत…’

uddhav thackeray and mpsc

पुणे : मागील काही दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पहायला मिळत आहे. आधीच विविध आरक्षणांमुळे अडकणाऱ्या शासकीय भरत्यांमध्ये कोरोनाची भर पडली. अनेक वर्ष परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणखी एका संधीची वाट पाहत तयारी करत आहेत, ज्या उमेदवारांची पूर्व परीक्षा झाली ते मुख्य परीक्षेची वाट पाहतायत तर ज्या उमेदवारांची मुख्य परीक्षा देखील झाली आहे ते नियुक्तीची वाट पाहतायत.

या सर्व चक्रामध्ये लाखो युवक-युवतींचे भविष्य हे अधांतरी टांगले गेले आहे. नियुक्ती होत नसल्याने स्वप्निल लोणकर याने टोकाचे पाऊल उचलले होते. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले होते. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 6 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत MPSC मार्फत 15511 पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर 30 जुलै 2021 वित्त विभाग शासन निर्णयानुसार (GR)प्रमाणे प्रत्येक विभागाने 30 सप्टेंबर 2021 MPSC आयोगाकडे रिक्त पदांची मागणीपत्रे पाठवावीत असे निर्देश देण्यात आले होते.

तर, ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख जवळ येऊन देखील कोणत्याच विभागाने मागणी पत्र दिले नसल्याची माहिती समोर आली होती. ‘महाराष्ट्र देशा’ ने देखील याबाबत वृत्त देऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. अखेर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ३०/९/२०२१ पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा आढावा घेऊन मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या