fbpx

वादग्रस्त ट्वीट: मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करावी, शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम महाराष्ट्र देशा: मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चौधरींवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित निधी चौधरी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट केली होती ‘१५० व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. ३०.०१.१९४८’ अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता. दरम्यान, आता चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित म्हंटले आहे की, मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकाऱ्याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून याअधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी.