निष्ठावंतांना गाजर : मुख्यमंत्र्यांनी केली निरंजन डावखरे यांची उमेदवारीसाठी शिफारस ?

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बक्षिस जाहीर केलं. डावखरे यांना अपेक्षेप्रमाणे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला संधी दिली असती तर तो जिंकून आला असता असं सांगितलं जातं, असं असताना निष्ठावंतांना संधी देण्याऐवजी भाजपने पुन्हा एकदा आयात केलेल्या उमेदवाराला संधी देण्याची तयारी सुरु आहे.

डावखरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला असून,निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.डावखरे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत  पक्षप्रवेश झाला.

यावेळी निरंजन डावखरे यांनीही राष्ट्रवादीत होत असलेल्या कोंडमा-याला वाट मोकळी करून दिली. स्थानिक नेत्यांकडून काम करताना त्रास होत होता म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार हे मोठे नेते आहेत. तरी मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. मुख्यमंत्री सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं यावेळी ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...