कर्नाटकची वेगळ्या ध्वजाची मागणी केंद्राने फेटाळली

वेबटीम : स्वतंत्र ध्वजाची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांनी केलेली मागणी केंद्र सरकारनं धुडकावून लावली आहे. राज्यघटनेत राज्यांच्या स्वतंत्र ध्वजाची कोणतीही तरतूद नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. राज्यघटनेतील ‘एक देश, एक ध्वज’ या सिद्धांताच्या आधारावर तिरंगा हाच संपूर्ण देशाचा ध्वज आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
राज्याची वेगळी ओळख असावी, यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं स्वतंत्र ध्वजाची मागणी केली आहे. ध्वजाच्या रचनेसाठी सरकारनं नऊ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती ध्वजाचा कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. दुसरीकडं कर्नाटकमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. केंद्रातील भाजप सरकार ‘एक राष्ट्र, एक निशाण’ ही घोषणा देत असताना कर्नाटक सरकार स्वतंत्र ध्वजाची मागणी करत असल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गृहमंत्रालय म्हणते, एक राष्ट्र, एक ध्वज
राज्यांसाठी वेगळा ध्वज असावा, अशी कोणतीही तरतूद घनटेत नाही. तिरंगा हा भारताचा एकमेव ध्वज आहे, असे मंगळवारी गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. आपले एक राष्ट्र आहे आणि त्यासाठी एकच ध्वज आहे. कर्नाटकाचा जनतेचा म्हणून एक ध्वज सध्या आहे. पण तो केवळ लोकांचे प्रतिनिधित्व करतो, सरकारचे नव्हे असे, गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. हा ध्वज स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय दिनांच्या वेळी फडकावला जात नाही. तर तो केवळ राज्य स्थापनादिनी फडकावला जातो, असेही या प्रवक्त्याने स्पष्ट केले.