केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून मदत करतंय; फडणवीसांनी मांडली लसींची आकडेवारी

devendra fadnavis vs uddhav thakrey

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

तर, कोरोनाचा वाढत धोका वेळीच रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे महत्वाचे आहे. राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रावरून पुन्हा माघारी फिरावं लागत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारने अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसींची सर्वाधिक गरज महाराष्ट्राला असताना सापत्न वागणूक केंद्र सरकार देतंय अशी टीका केली आहे. केंद्र सरकारवरील टीकेनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लसींची आकडेवारी मांडत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व मदत करतंय, असं भाष्य केलं आहे.

केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर केला जात आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

तर, ‘महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या आहेत. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. यातील 91 लाख लसी वापरल्या म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणीवपूर्वीक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय ?’ असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच, ‘आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा 9 ते 12 एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या 19 लाख लस मिळणार आहेत,’ अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे.

‘उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठे राज्य आहे. मात्र त्यांना 92 लाख लसींचे डोस मिळाले आहेत. मात्र, त्यांनी 83 लाख डोस वापरले आहेत आणि 9 लाख लसींच्या मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोस मिळाले नव्हते. त्यांना आता डोस प्राप्त होत आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे. आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करते आहे,’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :