‘कोरोना विरोधातील लढाईसाठी केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शक्य ती सर्व मदत करत आहे’

harshwardhan

नवी दिल्ली : करोना संक्रमणाचा देशभर होणारा फैलाव चिंतेत अधिक भर टाकतोय. आज सकाळी समोर आलेली करोनाची आकडेवारी धोक्याची घंटा ठरतेय. देशात गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजारांच्या घरात नवीन करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी देशातील अकरा राज्यांमधील कोविड-19 परिस्थितीचा आणि त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा दुर दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, पंजाब, छत्तीसगड, गुजरात आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.

कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यांनी त्यांची सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर द्यावा असे हर्षवर्धन म्हणाले. कोरोनाग्रस्त रुग्णांचं विलगीकरण करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील किमान पंचवीस ते तीस जणांची तपासणी करण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

स्थानिक निवडणुका, मोठमोठी आंदोलनं, विवाह आणि इतर सोहळे यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. कोविड संबंधीच्या नियमावलीचं अशा प्रकारच्या कार्यक्रमातून उल्लंघन होत असल्याचे ते म्हणाले. देशातील एकूण कोविड रुग्णांच्या संख्येच्या 54% रुग्ण हे या अकरा राज्यांमध्ये असल्याचं हर्षवर्धन यांनी नमूद केलं. तसंच यामुळं देशात झालेल्या मृत्यूच्या एकूण संख्येच्या 65 टक्के मृत्यू याच11 राज्यांमध्ये झाले आहेत असं त्यांनी सांगितलं. यात महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे.

केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्य ती सर्व मदत करत आहे असं ते म्हणाले. गेले काही आठवडे सातत्याने वाढत असलेल्या प्रसारामुळे देशाचा मृत्यू दर आता 1 पूर्णांक 30 दशांश टक्के झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकूण 8 कोटी 31 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या असून काल एकाच दिवसात लसीच्या 43 लाख मात्रा देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या