बेकायदा वाळूउपसा विरोधात मोहीम सुरु

औरंगाबाद : नदीकाठच्या वाळू पट्ट़यात मोठ़या प्रमाणावर होणा-या बेकायदा वाळू उपसा विरोधात मोहीम उघडण्यात आली असून वाळूसह 8 वाहने व एक जेसीबी वाळू वाहतूक करताना जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आली आहे. गोदावरी , शिवना या वाळू पट्ट़यात असलेल्या नदीपात्रातून राजरोसपणे वाळूचोरी होत असून तहसीलदार शेळके यांनी या वाळूमाफियांविरोधात जोरदार कारवाई करण्यास सुरू केली आहे. शिवना नदीच्या काठी बेकायदा माती उपसा आणि रेतीचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापे टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 21 ब्रास रेती जप्त करण्यात आली. त्याची किंमत 3 लाख रुपये आहे.शिवपूर हद्दीतील शिवना नदीच्या काठीही छापा घालून यापूर्वी मंडलाधिकारी यांनी वाळू चोरताना काही वाहने जप्त केली होती. रेती आणि माती उत्खनन थांबविण्याबरोबरच रेतीची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार विविध ठिकाणी सापळा लावून चार हायवा , टेंपो, एक टिप्पर ,एक जेसीबी जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.