‘हिंदू’ ही इंग्रजांनी दिलेली उपाधी; कमल हसन पुन्हा बरळले

टीम महाराष्ट्र देशा : वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले अभिनेते कमल हसन यांनी पुन्हा एकदा आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नाही. तसेच ‘हिंदू’ ही इंग्रजांनी दिलेली उपाधी आहे, त्यामुळे आपण ‘हिंदू’ ऐवजी ‘भारतीय’ म्हणावे असं कमल हसन म्हणाले आहेत.

कमल हसन यांनी तमिळ भाषेत ट्विट करत, ‘कोणत्याही प्राचीन ग्रंथामध्ये ‘हिंदू’ हा शब्द आढळत नाही. मोगल किंवा परकीय आक्रमकांनी आपल्याला हा शब्द दिला आहे. त्यामुळे ‘हिंदू’ या शब्दाला कोणत्याही धर्माशी जोडणं चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपली खरी ओळख ‘हिंदू’ म्हणून न करता, ‘भारतीय’ म्हणून केली पाहिजे. तसेच अलवर ते नयनमार आणि शैव ते वैष्णवांनीही कधीही ‘हिंदू’ या शब्दाचा वापर केलेला नाही.

त्याशिवाय कोणत्याही प्राचीन धर्म ग्रंथात ‘हिंदू’ या शब्दाचा साधा उल्लेखही आढळत नाही. त्यामुळे हा शब्द ब्रिटिशांच्या राजवटीत प्रचलित झाला आहे आणि आजतागायत आपण हा शब्द पुढे नेण्याचे काम करत आहोत’ असंही कमल हसन म्हणाले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता त्याचे नाव नथुराम गोडसे असे होते असं विधान हसन यांनी केले होते. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीका झाली होती.