fbpx

Video- कार्यकर्ते आपल्याच सोबत असल्याचा ब्रिगेडच्या आखरे-गायकवाड गटाचा दावा

पुणे : विविध सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र संभाजी ब्रिगेड हे नाव वापरण्यावरून आता दोन्ही गट आमने-सामने आले आहेत .विशेष म्हणजे आता तर संभाजी ब्रिगेड हे नाव वापरल्यास हे दोन्ही गट एकमेकांवर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा करू लागले आहेत . दोन्ही गटाचे कार्यकर्ते संभ्रमात असून नेमकी ब्रिगेडची भूमिका कोणती याबद्दल साशंकता निर्माण होऊ लागली आहे. मात्र कार्यकर्ते आपल्याच सोबत असल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत.

मराठा सेवा संघाची स्थापना १ सप्टेंबर १९९० ला झाली. मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणे हे ध्येय-धोरण घेऊन निघालेल्या या चळवळीने विविधांगी रूपाने फुलण्यासाठी व फुलवण्यासाठी वेगवेगळ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून जाळे विणले. या ३२ कक्षांपैकी १ म्हणजे संभाजी ब्रिगेड.अत्यंत आक्रमक आणि तेवढीच वैचारीक संघटना म्हणून या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांना जबरदस्त आकर्षण आहे. संभाजी ब्रिगेडचे पहिले अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. धर्मादाय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला.

एका बाजूला धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या नोंदणीत अध्यक्ष म्हणून अजून माझेच नाव असल्याचा दावा गायकवाड यांनी केला असून संघटनेचे नाव वापरण्याचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई करू असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

या वादावर महाराष्ट्र देशाने जेव्हा या दोन्ही गटांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रवीण गायकवाड यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्याच्या उद्देशाने कम बॅक केल्याचा दावा गायकवाड गटाचे अजय भोसले यांनी केला आहे तर शेकापमध्ये काहीच चालत नसल्याने गायकवाड पुन्हा संभाजी ब्रिगेडकडे वळले असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

पहा व्हिडीओ