लाचखोर विस्तार अधिकारी अटकेत

पुणे – चौकशी अहवाल वरिष्ठांना तात्काळ पाठविण्यासाठी पंचवीस हजाराची लाच मागून ती स्वीकारणा-या खेड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. श्रीकांत दाजी दणाने (वय-46, रा.बी/9 ओम रेसिडेंसी, रामलिंग रोड, शिरूर ता. शिरूर जिल्हा पुणे), असे विस्तार अधिका-याचे नाव आहे.

ही कारवाई पंचायत समितीच्या आवारात करण्यात आला. याप्रकरणी एका 31 वर्षीय इसमाने तक्रार दिली होती. तक्रारदार हे खेड तालुक्यातील चिंबली ग्रामपंचायत सदस्य आहेत. तक्रारदाराने आणि चिंबळीच्या सरपंचांनी, उप-सरपंच यांनी केलेल्या कामाबाबत तक्रार केली होती. त्याबाबत उपसरपंचांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याबाबतचा चौकशी अहवाल वरिष्ठांना तात्काळ पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी श्रीकांत दणाने यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाच स्वीकारताना दणाने याला रंगेहाथ पकडण्यात आले.