fbpx

विरोधीपक्षांचा मुख्यमंत्र्यांच्या चाहपान कार्यक्रमावर बहिष्कार

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आज पासून सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चाहपानचे आयोजन केले होते. मात्र या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यातील भाजपचे सरकार हे आभासी, निष्क्रिय, भ्रष्टाचारी, शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या बहिष्काराची घोषणा केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येत बैठक घेतली. येत्या अधिवेशनात सत्ताधारी सरकारला कसे घेरायचे यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत, सत्ताधारी भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. तर राज्य मंत्रिमंडळातून केवळ सहा मंत्र्यांना नव्हे तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भाजपच्या दीड डझन मंत्र्यांना वगळण्याची मागणी या वेळी विरोधकांनी केली.

यावेळी बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.