सुशीलकुमार शिंदेचे विरोधक नरसय्या आडम यांना मानाचे पान देत भाजपची तिरकी चाल

सोलापूर: कष्टकरी आणि कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाणारे नरसय्या आडम यांना मानणारा वर्ग सोलापूरमध्ये मोठ्या संख्येने आहे. आपल्या आमदारकीच्या काळामध्ये साकारलेल्या घरकुल योजनेमुळे संपूर्ण राज्यात त्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. दरम्यान आज त्यांचे स्वप्न असलेल्या कामगारांसाठी आणखी तीस हजार घरे निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी भाजप सरकारच्या मंचावर आडम मास्तर यांना मानाचे स्थान देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खडा आवाज, उत्तम संघटनकौशल्य व प्रश्न समजून घेण्याची हातोटी यामुळे सूतगिरणी असो वा यंत्रमाग किंवा विडी कामगार यांना आडम मास्तर यांनी लालबावटय़ाखाली संघटित केले आहे. लागोपाठ तीन वेळा आमदार राहिलेले नरसय्या आडम यांना 2009 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये देखील त्यांना दुसऱ्यांदा पराभवाला समोर जावं लागलं.

सध्या शहरातील तीन पैकी दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे तर एक काँग्रेसकडे आहे. यामध्ये नरसय्या आडम यांचा पराभव केलेल्या प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग तसेच विडी आणि सूतगिरणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना खुश करणं सत्ताधारी भाजपला गरजेचं आहे. त्यामुळेच आडम यांना पंतप्रधानांच्या मंचावर मानाचे स्थान आणि भाषण करण्याची संधी देऊन भाजपने तिरकी चाल खेळल्याच बोललं जातं आहे. एका बाजूला शिंदे पिता – पुत्रीच्या राजकारणाला शह देताना आडम मास्तर यांना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची हे घडवून आणण्यात महत्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना कॉ. नरसय्या आडम यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि आमचा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंजूर करून आणला. ‘ये छोटा घर गरीब के लिए बंगला ही है, अगर ये बनाने में सरकारने पुरा सहयोग किया तो ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ असे आडम म्हणाले. यापूर्वीचा दहा हजार घरांचा प्रकल्प माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारजी वाजपेयी यांनी मंजूर केला आहे. आताचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करण्यास मदत केली असल्याचे सांगितले.