fbpx

भाजपने माझा वापर केला, भावासारख्या मुख्यमंत्र्याने लाथ मारली – खा. काकडे

sanjay-kakde

पुणे: भाजपने माझा केवळ वापर केला, मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारल्याचे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधला आहे. आज संजय काकडे यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला रामराम करण्याचे संकेत देखील दिले आहेत.

खा संजय काकडे आणि भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा आणखीन वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून काकडे यांचे भाजप नेत्यांसोबत आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. मध्यंतरी त्यांनी शिवसेनेशी युती न झाल्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील पराभूत होतील, अशी टीका केली होती. काकडे यांनी थेट दानवे यांनाच टार्गेट केल्याने भाजप नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोलल गेल.

आज भाजपकडून करण्यात आलेला एक सर्व्हे समोर आला आहे, यामध्ये लोकसभेसाठी युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हि सर्व परिस्थिती पाहता काकडे यांनी इतर पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे.

दरम्यान, आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून गिरीश बापट आणि रावसाहेब दानवे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय काकडे यांनी केला आहे. तसेच मी मुख्यमंत्र्यांना भावासारख मानतो पण त्यांनीच लाथ मारली आहे. आता भावानेच लाथ मारल्याने दुसरे घर शोधावे लागणार असल्याचं काकडे म्हणाले.