fbpx

भाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय विखे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही, अथवा त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही, असे ठणकावून सांगत असताना जर कॉंग्रेस आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा आघाडीला देऊन आपली उमेदवारी फिक्स असल्याचे घोषित केले. त्यामुळे डॉ. सुजय विखेंनी आघाडीची चांगलीच गोची केल्याचे दिसत आहे.भाळवणी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

‘गेली 15 वर्षे मतदार संघात कधीही न फिरणारा, लोकसभेत न बोलणारा मुका व अदृष्य खासदार तुम्ही निवडून दिला आहे असे म्हणत सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावरही सडकून टीका केली. माझा विरोध दिलीप गांधी यांना नाही. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा उपयोग जनकल्याणसाठी झाला पाहिजे. दुर्देवाने त्या पदाचा उपयोग टक्केवारी गोळा करण्यासाठी होतो आहे. प्रस्तापित, टक्केवारी घेणाऱ्यांविरोधात मी आवाज उठविला असून मला निवडणून द्यायचे की नाही ते तुम्हीच ठरवा, अशा शब्दात उपस्थित जनसमुदायाला आवाहन केले.

पुढे बोलताना विखे म्हणाले, माझ्या उमेदवारीस विरोध केला जात आहे, कारण मी सामान्य माणसाचा आवाज आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करतो. प्रत्येक पक्षात चांगले व वाईट लोक असून राजकारण हा खोटे बोलण्याचा धंदा झाला आहे. काँग्रेस आघाडीने उमेदवारी दिली तर ती नम्रपणे स्वीकारीन मात्र कोणत्याही पुढाऱ्यासोबत रात्रीतून सेटलमेंट करणार नाही. मी खासदार होणार किंवा नाही हे जिल्हयातील चार पुढारी ठरवू शकत नाहीत. मतदारसंघातील साडेसतरा लाख मतदार ते ठरवतील. खोलीत बसून आदेश देणारे पुढारी माझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत. आदेश देणारे वेडे व ते घेणारे त्यापेक्षाही वेडे. असंंही यावेळी विखे म्हणाले.