भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष; आमदार जयंत पाटलांची टीका

भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष; आमदार जयंत पाटलांची टीका

मुंबई : भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा पक्ष बनल्याची जोरदार टीका शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. भाजप आता पूर्वीसारखा राहिला नसून उसन्या नेत्यांचा आणि कोणतीही ध्येयधोरणे नसलेला पक्ष झाला आहे, अशीही टीका जयंत पाटलांनी केली आहे. खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात शेकापचा मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा समाचार घेतला.

भाजप आणि शेकापची ध्येयधोरणे संपूर्णपणे वेगळी आहेत. तरी पूर्वीच्या भाजपमधील नेते-कार्यकर्ते त्यांच्या विचारांशी बांधील होते, पण आता भाजपमध्ये मूळ निष्ठावंत कमी उरले आहेत आणि पाट लावून बाहेरून आणलेल्या उपऱ्यांची जास्त भाऊगर्दी झाल्याचेही जयंत पाटील म्हणाले आहेत. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असून हे सरकार सर्वसामान्यांसाठी नाही तर धनदांडग्यांसाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

रायगड जिल्ह्यात यापुढे कोणत्या पक्षाबरोबर युती-आघाडी करायची याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कोणताही निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवला जाईल. शेकाप पूर्ण ताकदीनिशी स्वबळावरही निवडणूक लढवू शकतो. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महत्वाच्या बातम्या