वस्तादांना श्रद्धांजली वाहताना बालाने केला होता ‘हा’ निश्चय

टीम महाराष्ट्र देशा- अभिजित कटकेला महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव असल्याने त्याचे फायनलमध्ये पारडे जड असल्याचं अनेकांचं म्हणणं होत. मात्र अभिजित समोर तगडे आव्हान निर्माण करून झुंजार आणि आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत बाला रफिकने जालना येथे झालेल्या कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

मुळच्या करमाळा तालुक्यातील खडकी येथील बाला हिंदकेसरी स्वर्गीय गणपतराव आंदळकर यांचा शिष्य आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोबत त्याने कुस्तीचे धडे घेतले. बालाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर हे यश आंदळकर यांना समर्पित केले. बाला हा आंदळकर यांचा शेवटचा शिष्य होता. तीन महिन्यांपूर्वी आंदळकर यांना श्रद्धांजली वाहत असताना त्याने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्याचा निश्चय केला होता. या यशाने त्याने आंदळकर यांचे स्वप्न पूर्ण केले.