नेमक्या कोणत्या मुद्यावर मतं मागणार हे बागलांनी जाहिर करावं : वैभवराजे जगताप

करमाळा : नेमक्या कोणत्या मुद्यावर मतदारांना मत मागणार हे बागलांनी जाहिर करावे आणि मग मत मागावीत असे खुले आव्हान करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी रश्मी बागल व दिग्विजय बागल यांना दिले आहे. हिसरे गणातील जगताप पाटील युतीचे उमेदवार गोरख लावंड यांच्या प्रचारा निमित्त हिवरे येथे झालेल्या जाहिर सभेत बोलत होते.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे. प्रचारात जगताप गटाने आघाडी घेतली असून सभांना देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जयवंतराव जगताप यांच्या सोबत युती केल्याने या तिघांच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

हिवरे येथे झालेल्या सभेत पृथ्वीराज पाटील, भरत आवताडे, मिरगव्हाण चे सरपंच अशोक घरबुडे हिवरे चे सरपंच बापुराव फरतडे हिसरे चे माजी सरपंच बाळासाहे पवार माजी पंचायत समिति सदस्य तात्यासाहेब शिंदे संतोष लावंड आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी अधिक बोलताना वैभव जगताप म्हणाले की बागलांच्या ताब्यात असलेल्या मकाई कारखान्यावर जप्ती आली आहे अदिनाथच्या कामगारांच्या पगारी थकल्या आहेत, उसाची देणी थकली आहेत, कामगारांच्या बायकांना दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला जावे लागत आहेत, हे बहिण भाऊ मात्र ऐशो आरामत आहेत याचा मतदरांनी त्यांना जाब विचारावा. बागलांच्या ताब्यात सत्ता का देऊ नये यासाठी शेकडो मुद्दे आहेत पण जगताप पाटील युती कडे का सत्ता देऊ नये याचा एकही मुद्दा बागल व त्यांच्या बगल बछयांकडे नाही. तेंव्हा मतदारांनी या बाबींचा विचार करुन मतदान करावे व पाटील जगताप युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन जगताप यांनी शेवटी केले