जाणून घ्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त

लाखो भाविक आपल्या लाडक्या गणेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आता जवळ आला आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश स्थापनेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. मात्र अवघ्या काही तासांवर गणेशाच आगमन असताना मूर्ती प्रतिष्ठापना कधी करायची असा प्रश्न भाविकांमध्ये आहे.

उद्या म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजेच पहाटे ४.३० वाजल्यापासून ते दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. तसेच प्रत्येक ज्योतिष शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेची वेळ वेगवेगळी देण्यात आली आहे.

या वर्षी श्री गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. आज हरितालिका पूजन आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनंतर भद्रा असली तरी, श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास ती वर्ज्य नाही. त्यामुळे शुक्रवारी ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी १.४५ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

गुरुवारी हरतालिका पूजन होणार आहे. यंदा दशमीची वृद्धी झाल्याने गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, पाच सप्टेंबरला विसर्जन आहे. त्यादिवशी मंगळवार असला तरीही नेहमीप्रमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी सन २००८, २००९ २०१० रोजी गणेशोत्सव १२ दिवसांचा होता.