अट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही- आठवले

athvale_pc

पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेला हिंसाचार पूर्वनिजोयित होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, अशी मागणी करतानाच कोणत्याही परिस्थिती अट्रॉसिटी कायद्याला हात लावू देणार नाही, असा इशारा केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading...

रामदास आठवले म्हणाले, सणसवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना संरक्षण दिले गेले पाहिजे, या संदर्भात ग्रामीण पोलिसांना सूचना केल्या आहेत. या संपूर्ण हिंसाचारात 9 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होणार नाही. दलितांना आपले मित्र मानून काम करा असाही सल्ला आठवले यांनी दिला.

कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी रोजी हिंसाचार उसळला. त्यानंतर या हिंसाचाराचे पडसाद 2 जानेवारीला महाराष्ट्रभर उमटले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या महाराष्ट्र बंदमध्ये आणि इतर आंदोलनामध्ये आरपीआय पक्षाचा सहभाग आघाडीवर होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे झाले किंवा रामदास आठवले मागे पडले असे म्हणणे योग्य होणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

जिग्नेश मेवाणी याच्या सभेविषयी विचारले असता रामदास आठवले म्हणाले, नक्षलवादाकडे जाणारा नाही तर युध्दाकडून बुध्दाकडे जाणारा खरा आंबेडकरवादी होय. नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचे आजवर भले झालेले नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. आम्ही त्यांना आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ. निवडून आणून मंत्रिपदही देऊ. त्यामुळे जिग्नेश मेवाणीने नक्षलवाद्यांच्या नादाला लागू नये. मेवानी हा आंबेडकरवादी असेल, तर त्याने लाल सलाम न म्हणता जय भीम म्हणावे. शिवाय मेवानीला चांगला नेता व्हायचे असेल, तर त्यांनी उलट सुलट भाषण करून आंबेडकरवादी तरुणांना भरकटवण्याचे काम करू नये.

दलितांना जमिनी देण्याविषयीच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले, फक्त दलित व्यक्तीलाच नाही तर गावामध्ये वास्तव्य करणा-या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी आम्ही खूप वर्षांपूर्वी केली होती. गावातील गरीबी हटवायची असेल आणि शहरात येणारे लोंढे रोखायचे असतील तर फक्त दलित व्यक्तीलाच नाही तर गावामध्ये वास्तव्य करणा-या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला जमीन दिली पाहिजे.

रिपब्लीकन ऐक्याविषयी बोलताना ते म्हणाले, मी अजूनही ऐक्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या निवडणुकीत दलितांतील प्रतिनिधींना सत्तेत जायचे असेल, तर ऐक्य होण्याची गरज आहे. त्यासाठी एक सूत्र ठरवून घ्यायला हवे. कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला आपण तयार आहोत.संविधानाला ग्रंथ मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. संविधानाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी दिल्लीत बसलेलो आहे. संविधान बदलू पाहणाऱ्या लोकांकडे बघण्यास मी समर्थ आहे. त्यामुळे दलित बांधवानी संविधान बदलेल, ही भीती काढून टाकावी, असेही आठवले म्हणाले.Loading…


Loading…

Loading...