कॉंग्रेस नेता म्हणतो ‘मी लष्करात असताना सैन्याने जवळपास १०० सर्जिकल स्ट्राइक केले’

army

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय लष्कराच्या कर्तुत्वाचे श्रेय स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घेत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून वारंवार होत आहे. पण आता कॉंग्रेसचे काही नेते इतिहासातील लष्करी मोहिमांचे दाखले देत आम्ही देखील आमच्या काळात स्ट्राईक केल्याचा दावा करत आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग  यांनी देखील एनडीटीव्हीला मुलाखत देताना कॉंग्रेसच्या काळात झालेल्या स्ट्राईकबाबतचे भाष्य केले. ते म्हणाले की, ज्याला लष्कराचा इतिहास माहिती आहे. त्याला माहितीच असेल की, याआधीही बऱ्याचदा सर्जिकल स्ट्राइक झाले आहेत.मी लष्करात असताना त्याकाळात क्रॉस बॉर्डर रेड या नावाने जवळपास १०० स्ट्राईक झाले आहेत.

या मुलाखतीत अमरिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदींच्या लष्करा बाबतच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अमरिंदर सिंग म्हणाले की, भाजपाला इतिहासाची माहिती नाही. वर्षं 1947मध्ये कोण पंतप्रधान होतं? 1962मध्ये कोण पंतप्रधान होतं?, तसेच 1965 आणि 1972मध्ये कोण पंतप्रधान होतं?, आम्हीच पाकिस्तानचे तुकडे केले आहेत.

इंदिरा गांधींनी हे सर्व केलं, परंतु त्यांनीही कधीही म्हटलं नाही की मी केलं. त्यांनी त्यावेळी फक्त एवढंच म्हटलं होतं की, भारतीय सेना आणि फील्ड मार्शल सॅम मानेकशाची मी आभारी आहे. त्यांनी दुसऱ्यांना श्रेय दिलं. पण ही व्यक्ती (नरेंद्र मोदी ) म्हणते मी हे केलं?, तुम्ही कोण आहात?, ही तुमची सेना नाही. ती भारताची सेना आहे.त्यामुळे भाजप एकतर ज्ञाना अभावी अशी वक्तव्य करत आहेत किंवा ते जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी बोलत असावेत. असा टोला अमरिंदर सिंग यांनी यावेळी लगावला.