मनपातील अपयश झाकण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा देखावा; मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचे मनसेचे आव्हान

Suhas Dashrathe

औरंगाबाद : महानगर पालिकेतील आजपर्यंतचे अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी शिवसेना १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबवत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केला आहे. या योजनेसाठी जलसंपदा, रस्ते महामंडळ आणि पर्यावरण विभागाची परवानगी नसतांना गल्लीबोळात जलवाहिन्या टाकण्याचा देखावा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यालाच स्थानिक पदाधिकारी ‘स्मार्ट सिटी’चा विकास म्हणत ढोल बडवत असल्याचेही ते म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.

डिसेंबरमध्ये योजनेचे उद्घाटन झाले मात्र, ९ महिन्यात प्रशासन या संबंधी एकही प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे सरकार जनतेला नुसते गाजर दाखवत असल्याचा आरोपही दाशरथे यांनी केला. या संदर्भात जलसंपदा विभागाचे आरक्षण, पर्यावरण संदर्भातील परवानगी, रस्ते विकास महामंडळाच्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच या योजनेत पालिकेला ३० टक्के म्हणजेच ५०४.१५ कोटी रुपयांचा वाटा भरवा लागणार आहे. तो अद्याप पालिकेने भरलेला नाही. १९९२ नंतर शहराची तहान भागवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने एकही पाहईपलाईन टाकलेली नाही. जायकवाडीजवळच काम सुरू नसताना शहरात जलवाहिन्या टाकून काय मिळणार? परवानग्या नसतांना नवीन योजनेचे टेंडर कसे निघाले, वर्क ऑर्डर कशी देण्यात आली? असा सवाल दाशरथे यांनी केला आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री शहरात येत आहेत. त्यांनी हिंमत असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला द्यावी असेही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जनतेच्या पैशाचा चुराडा होवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. पाणी कधी मिळणार हे जनतेला सांगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या