हॉटेलचा पत्ता न सांगणे पडले महागात ; तरुणावर गोळीबार

टीम महाराष्ट्र देशा : हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून अल्पवयीन तरुणावर गोळीबार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात फरासखाना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सनी चौधरी असे त्या अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. तसेच या प्रकरणी अंबादास अशोक होंडे (वय २८, रा. दापोडी, मुळ अहमदनगर) याला अटक केली आहे.

सनी चौधरी हा शुक्रवारी सायंकाळी एका हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात असतांना त्याच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार तेथे आली. त्यावेळी स्कॉर्पिओमधील व्यक्तींनी त्याला प्यासा बार कुठे आहे? असे विचारले. दरम्यान मला माहित नाही असे उत्तर सनीने दिले. त्यावेळी गाडीतील तरुणांनी सनीला दमबाजी केली त्यावेळी सनी हॉटेलचा पत्ता सांगण्यास तयार झाला. त्यानंतर सनीला गाडीत बसवून सर्व प्यासा हॉटेलजवळ आले. तेथे आल्यावर त्यांनी सनीला पैसे देत बार मधून दारू घेऊन येण्यास सांगितले. सनी दारू घेऊन आल्यानंतर त्यांनी गाडीतच दारू पिली आणि सनीला डेक्कनला सोडतो म्हणत गाडीत बसवले.  परंतु ते डेक्कनहून पुढे निघाले. गाडीत बसलेले असताना त्यांनी सनीला तू आधी बार का दाखविला नाही. असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर त्याला शिवीगाळ करून मारहाण करत असताना सनी ओरडू लागला म्हणून होंडे याने आपल्याजवळील एअरगन काढून त्याच्या पायाजवळ फायर केली. आणि त्याला मरीआई गेटजवळ सोडून ते निघून गेले.

त्यानंतर सनीने घाबरून हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला नाही. पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले तेव्हा तो त्यांच्यासोबतच गाडीमध्ये बसताना तो दिसला त्यावेळी त्याने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.

या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय २८, रा. दापोडी, मुळ अहमदनगर) याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर २ साथीदारांचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, अंबादास अशोक होंडे हा अहमदनगरधील सोनई पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो दापोडीमध्ये एका नातेवाईकाकडे राहतो.