डॉक्टरांवर वार करणा-या आरोपीला अटक; दोन अल्पवयीन ताब्यात

पुणे : पिंपळे गुरव येथील डॉ. अमोल बीडकर यांच्यावर गर्भपातास नकार दिल्याने वार करणारा आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केला असून या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलेही ताब्यात घेतले आहेत. सिद्धार्थ साजन सुर्वंशी हा मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे दोन अल्पवयीन साथीदारही पोलिसांनी आज (सोमवारी) ताब्यात घेतले आहेत.

पिंपळे गुरव येथील सखी नर्सिंग होमचे डॉ. अमोल बीडकर यांच्यावर गर्भपातास नकार दिला म्हणून शनिवारी रात्री सिद्धार्थने मित्रांसह येऊन दवाखान्यातच बीडकर यांच्यावर कोयत्याने वार केले होते. यामध्ये बीडकर यांच्या डाव्या खांद्याला व हाताच्या बोडाला दुखापत झाली होती. सिद्धार्थ एका 19 ते 20 वर्षीय मुलीला घेऊन बीडकर यांच्या दवाखान्यात गर्भपात करण्यासाठी आला होता. त्याने संबंधित मुलीशी लग्न जमले असल्याचे सांगितले. मात्र लग्नाआधी मूल नको म्हणून गर्भपात करत असल्याचे त्याने सांगितले.

यावेळी बीडकर यांनी तपासले असता संबंधित मुलगी पाच महिन्याची गरोदर होती. कायद्यानुसार पाच महिन्याचा गर्भपात करणे शक्य नसल्याचे सांगत डॉ. बीडकर यांनी गर्भपातास नकार दिला. याचाच राग मनात धरत सिद्धार्थने बीडकर यांच्यावर कोयत्याने वार केले होते.