कमिशन न मिळाल्याने फोर्ज कंपनतील लेखापालाची आत्महत्या

चाकणमध्ये कमिशन न मिळाल्याने एका लेखापालाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. निलेश गायकवाड असं मृत लेखापालाचे नाव आहे. तो फोर्ज कंपनीत कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ज कंपनीतील निलेश गायकवाड (वय ३२, रा.कोंढवा पुणे) याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपासून तो चाकणमधील गंधर्व हॉटेलमध्ये राहत होता. दोन दिवसांपासून त्याच्या रुमचा दरवाजा बंद असल्यामुळे हॉटेलमधील कर्मचऱ्याना संशय आला. त्यांनी यासंदर्भात चाकण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निलेशने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याने सुसाईड नोट लिहिली असून यात फोर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या नावाचा उल्लेख केलाय.
अमित कल्याणी यांना एका व्यवहारासाठी निलेशने १५ कोटी रुपये मिळवून दिले होते. त्यापैकी साडे अकरा कोटी रुपये अमित यांनी परत केले. मात्र उर्वरित रक्कम आणि निलेशचे ६० लाखांचे कमिशन देण्यात ते टाळाटाळ करत होते. दुसरीकडे १५ कोटी रुपये देणाऱ्या व्यक्तिने निलेशकडे पैशांसाठी तगादा लावला होता. मानसिक तणाव वाढल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.