360 एक्स्प्लोरर टीमने १२,५०० फुटांवर तिरंगा फडकवला; पॅरालाईज असलेल्या चैतन्यचा विक्रम

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेच्या मार्गदर्शनाखाली पॅरालाईज असलेल्या चैतन्य कुलकर्णीचा विक्रम

रमेश कलेल, गणेश नारकर यांनीही गाठली उंची

सोलापूर – एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनाली जवळ “नेगीडुग” या ठिकाणी १२,500 फुट चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीन सुरु होवून १४ फेब्रुवारी रोजी १२,500 फुटांवर चढाई करून यश मिळवले. ४ वर्षापूर्वी झाडावर पडून अपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली वर्षभर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक तयारी तो करत होता. मुंबई मध्ये सध्या काम करत असलेले गणेश नारकर व रमेश कलेल यांनीही ही उंची गाठण्यात यश मिळवले आहे. याच काळात मनाली परिसरात हाय-अलर्ट होता व सतत बर्फ पडून सर्व वाट निसरडी झाली होती. घसरडा रस्ता, धुक्यात हरवणारी वाट, वरून पडणारा बर्फ, बदलते वातावरण ई. अनेक अडचणींना व आव्हानांना तोंड देत सर्वांनी “नेगीडुग” हा ट्रेक पूर्ण केला.

अक्षया-आनंदची “मिशन फिनिक्स”-

आंतरराष्ट्रीय सक्सेस कोच असलेल्या एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व त्याच्या पत्नी अक्षया बनसोडे यांनी “फिनिक्स मिशन” सुरु केले असून अनेक अपंग, आत्मविश्वास गमावून बसलेले, वंचित घटकातील लोकांना साहसी खेळाद्वारे आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहायला लावून त्यांना लाइफ कोचिंग ते देत असतात. या अंतर्गतच या मोहिमेत चैतन्य कुलकर्णी या कमरेखालून पॅरालाईज असलेल्या युवकाला जगण्याचा “फिनिक्स मार्ग” देण्यासाठी ही माहीम आयोजित केली होती. कोणाला अश्या पद्धतीने निराशेच्या गर्तेतून बाहेर पडायचे असेल तर 9067045500 / 9067035500 वर संपर्क करावा असे अक्षया बनसोडे यांनी सांगितले आहे.

आनंद बनसोडे

“हिमालयाच्या १२, 500 फुटांव पोहचून सर्वजण भावूक झाले होते. तिरंगा फडकवताना सर्वाना खूप समाधान वाटत होते. येणाऱ्या काळात 360 एक्स्प्लोरर मार्फत अश्या अनेक मोहिमाद्वारे गिर्यारोहण व निसर्ग भटकंतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम सामाजिक बांधिलकी जपून करण्यात येणार आहे. याशिवाय अपंग व वंचित घटकातील सर्वाना प्रेरणा देण्याचे काम करण्यात येणार आहे.”

चैतन्य कुलकर्णी (360 एक्सप्लोरर ट्रेकर)

360 एक्स्प्लोरर मार्फत आनंद बनसोडे सरांकडून गेली वर्षभर ट्रेनिंग घेत आहे. फक्त सरांमुळेच माझ्या आत असलेल्या भीतीवर मात करून मी सध्या सकारात्मकपणे आयुष्य जगण्यासाठी सुरवात केली आहे. १२,500 फुट उंचीवर जाणे व तिरंगा फडकावणे हे फक्त सरांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात माझासारख्या असंख्य मुलांना मला प्रेरणा द्यायची आहे.

गणेश नारकर व रमेश कलेल (ट्रेकर)

हा आमचा पहिला हिमालय ट्रेक होता. आम्ही जे स्वप्न पहिले होते त्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण होता. 360 एक्सप्लोरर चे योग्य नियोजन व नैसर्गिक अडचणीअसताना टीमने घेतलेले निर्णय यामुळेच हा ट्रेक यशस्वी होऊ शकला. पुढे आम्हाला ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याची इच्छा आहे.