भीमा कोरेगाव प्रकरणी 10 सदस्यीय समिती स्थापणार

पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास योग्य रितीने होण्यासाठी पोलीस व दलित संघटनांच्या प्रतिनिधींची 10 सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत विश्वास नांगरे पाटील यांनी दंगलीसंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास कसा सुरू आहे, कुठपर्यंत आला आहे याची माहिती दिली. दलित संघटनांनी या दंगलीला कारणीभूत असणारे मिलींद एकबोटे, संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर कडक कारवाई करा, दंगली संदर्भात अनेक मेसेज, व्हिडिओ व्हायरल केले गेले आहेत, त्याचीही तपासणी केली जावी.

तसेच १ जानेवारीच्या आधी वढू येथे झालेल्या प्रकाराची माहिती पोलीस प्रशासनाला होती. तरीही त्यांनी सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेतली नाही. त्यामुळे याप्रकरणाला स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, अतिरिक्त अधीक्षक जबबादार आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काही जणांनी केली. दलित संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी याप्रकरणात समन्वय रहावा यासाठी दलित संघटनांच्या प्रतिनिधींची १० सदस्यांची समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले.

ज्यांना या प्रकरणाबाबत काही सुचना, पुरावे मांडायचे आहेत त्यांनी ते द्यावेत असे त्यांनी सांगितले. बैठकीतील प्रतिनिधींनी यास मान्यता दिली. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे हे पोलिसांना नावे कळविणार आहेत. दंगली प्रकरणी आत्तापर्यंत दोन्ही समाजातील ४३ जणांना अटक केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, त्यानुसार तपास सुरू आहे.