मोदींचा ‘हा’ गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो : अमित शाह

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासह जगातही लोकप्रिय आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येते. अशातच गृहमंत्री अमित शाह यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये लिहिलेल्या लेखात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं विधान केले आहे.

अमित शाह यांनी ‘स्वातंत्र्यानंतर देशानं १७ लोकसभा निवडणुका पाहिल्या, २२ सरकारं आणि १५ पंतप्रधान पाहिले. प्रत्येकानं आपापल्या परीनं देशाच्या विकासात योगदान दिले. मात्र, एका गुणामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात, तो गुण म्हणजे त्यांची मजबूत इच्छाशक्ती अशा शब्दात मोदींचे कौतुक केले आहे.

तसेच पुढे त्यांनी ‘काँग्रेसनं तब्बल ५५ वर्षे या देशावर राज्य केलं. पूर्ण बहुमतासह त्यांना आठ संधी मिळाल्या. मात्र, देशाचं भाग्य बदलणारे किंवा व्यापक परिवर्तन घडवणारे १० निर्णय देखील काँग्रेस घेऊ शकली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी परिस्थिती बदलण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न केले. मात्र, बहुमताअभावी त्यांना ते शक्य झालं नाही असंही शाह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शाह यांनी पुढे २०१४ नंतर मोदी सरकारनं परिवर्तनाची व्याख्याच बदलून टाकली आहे. गेल्या ६३ महिन्यांत मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झालाच, पण देशाच्या विकासातही भर घातली. मजबूत इच्छाशक्ती हीच मोदींची ओळख आहे अशा शब्दात मोदींचे कौतुक केले आहे.