fbpx

…’ती’ माझ्या राजकीय जीवनातील मोठी चूक होती : अजित पवार

पुणे : माझ्याकडून एकदा चुक झाली तेव्हा मी माफी मागितली, आत्मक्लेष केला. पुन्हा तशी चुक होऊ दिली नाही. पण आताचे राज्यकर्ते शेतकऱ्यांना लावारीस म्हणतायत, हनुमानाची जात काढताय, शेतकऱ्यांना साले म्हणतायत. यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे अश्या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

पवार कुटुंबियांचा गड असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी खा सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी पुण्यातील नरपतगिरी चौकात सभा घेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करु नये, काळजी करायची असेल तर शेतकरी, बेरोजगारांची करा या मुद्द्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.

मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमान खरेदीची शंका डोक्यातून काढली असती बरं झालं असते असा टोला देखील पवार यांनी लगावला आहे. अजित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटतं देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि मी कधी काळी एका छोट्याश्या गावात केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करतात. मी त्यावेळी केलेले ते वक्तव्य ही माझ्या राजकीय जीवनातील मोठी चूक होती असे मानतो. त्याबाबत मी अनेकदा माफीही मागितली आहे. त्यानंतर अनेक निवडणुकाही झाल्या. मात्र, त्यानंतरही पतंप्रधानांनी तो मुद्दा पुन्हा उकरून काढला जातो असं त्यांनी म्हटलं आहे .