‘विधिमंडळातील ‘ते’ वक्तव्य चुकीचे, मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी’

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन मार्च रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचे नव्हते असा शब्द विधिमंडळात वापरला. यामुळे समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा प्रकारे वक्तव्य करून ब्राह्मण समाजाचा अवमान केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका जबाबदार पदावर असून त्यांच्याकडून एखाद्या समाजाचा अवमान होईल असे वक्तव्य येणे अपेक्षित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागून आपले शब्द परत घ्यावेत. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या या वक्तव्याचा संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व, शेतकरी, महागाई, स्वातंत्र्य लढा यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले. या प्रस्तावावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून तुकाराम महाराजांच्या अभंगातील पाहिजे जातीचे येरेगाबाळे न कामाचे ही ओळ ऐकवली होती. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही. बाबरी पडल्यावर येरेगबाळे पळून गेले. एकटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांसह सरकार स्थापन करणाऱ्या भाजपचे हिंदुत्व भ्रष्ट झालेले असून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही, असे ठाकरे म्हणाले. सत्तेवर आल्यावर जनतेला न्याय देता येत नसेल तर भारत माता की जय म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही सुनावले.

महत्वाच्या बातम्या