बीड : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांचाही यात समावेश आहे. नवनिर्वाचित मंत्री भागवत कराड यांनी यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी बीडच्या परळी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीतच कराड यांची यात्रा सुरू झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या एका घोषणेमुळे पंकजा मुंडे यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना जाहीरपणे झापले.
आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
‘पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है’, ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे’ यासह अनेक घोषणा याठिकाणी देण्यात आल्या. यावेळी ‘पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है’ या घोषणेवरुन पंकजा मुंडे प्रचंड संतप्त झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं. चुकीच्या घोषणा देणाऱ्यांना मी बोलणार नाही, भेटणार नाही, चांगल्या घोषणा द्या, भंगार अंगार या काय घोषणा देतायत, हे संस्कार आहेत का आपले, असं म्हणत संतापलेल्या पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापले.
अशा घोषणा देणाऱ्यांना त्या मूर्ख म्हणाल्या. ‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेब अमर रहे… या घोषणा मी रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार, भंगार हे काय लावलंय? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?,’ असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘असं वागणं मला शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाहीतर मला भेटायला येऊ नका,’ असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.
महत्त्वाच्या बातम्या
- सुष्मिता देव यांनी राजीनाम्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा’ काँग्रेसची भूमिका
- ‘भावनाताई, चोरी झालेली ७ कोटींची कॅश कोठून आली?’, किरीट सोमय्यांचा सवाल
- हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता यांनी घेतली राज्यपालांची भेट, केली ‘ही’ मागणी
- काँग्रेसला धक्का! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव यांचा तडकाफडकी राजीनामा
- आजपासून ‘या’ चार केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा