लॉकडाऊन : मुळशी तालुक्यातील पहिल्या ‘संचार बंदी’ गुन्ह्याची नोंद

घोटावडे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, यानंतरही अनेक ठिकाणी नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. मुळशीमध्ये देखील असा प्रकार पाहायला मिळाला आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर मुळशी तालुक्यातील पहिला गुन्ह्याची नुकतीच नोंद करण्यात आली आहे मुळशी तालुक्यामधील बोतरवाडी येथील तरुणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.२५ ) रोजी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार सुनील मगर, पोलीस शिपाई मयूर निंबाळकर नेहमीप्रमाणे संचारबंदी असल्याने उरावडे परिसरात गस्त घालत होते. तेव्हा रात्री सातच्या सुमारास बोतरवाडी गावामध्ये एका पारावरच्या कट्ट्यावर गावातील काही तरुण एकत्र येऊन गप्पा मारीत आहेत, अशी माहिती या पथकाला मिळाली.

दरम्यान, त्याठिकणी जाऊन खात्री केली असता गावातील एका कट्ट्यावर चार ते पाच जण संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून तोंडाला मास्क न लावताच बसलेले दिसले. तेव्हा पोलिसांना पाहताच ते सर्व पळू लागले तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील एकाला पकडले. त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचारबंदी लागू केल्यानंतर मुळशीतील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांनी संयम राखून या राष्ट्रीय आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पौड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.