500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे शिवसेनेला विस्मरण

ठाणे: ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मोठा गाजावाजा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकर जनतेला 500 चौरस फुट घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसेनेची घोषणा हवेत विरली असली तरी भाजपा नगरसेवक कृष्णा पाटील आणि नंदा पाटील यांनी येत्या सर्वसाधारण सभेत प्रस्तवाची सूचना मांडत कर माफीची मागणी केली आहे. तसे पत्र महापौर मिनाक्षी शिंदे यांना सादर केले.

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 साली संपन्न झाली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणेकरांना मालमत्ता कर माफ करण्याचे अभिवचन दिले होते. शिवसेनेच्या प्रकाशित जाहिरनाम्यात देखील त्याचा उल्लेख होता. मात्र एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेला आपल्या पक्षप्रमुखांची घोषणा प्रत्यक्षात उतरवता आलेली नाही. भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील आणि नंदा पाटील यांनी डिसेंबर महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 500 चौरस फुटापर्यंत च्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची प्रस्तावाची सूचना मांडली आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन नववर्षाची ठाणेकरांना भेट देण्याचे आवाहन नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सत्ताधा-यांना केले आहे.