विविध कार्यक्रमांनी साजरा केला ठाणे महापालिकेने स्वातंत्र्यदिन

ठाणे : भारताचा ७१ वा स्वातंत्र्यदिन ठाणे महानगरपालिकेने दहा हजार कांदळवन झाडांची लागवड करून आणि एक सूर एक ताल या देशभक्तीवरील कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा केला. आज सकाळी ८.१५ वाजता महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालय येथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर कै. बल्लाळ सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश मस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि राइड फॉर कॉज या संस्थेच्यावतीने खारफुटी वाचवा याविषयी जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये जवळपास ३०० तरूण-तरूणी सहभागी झाले होते. या सर्वांनी कोपरी येथील स्वामी समर्थ मठाजवळ जवळपास १० हजार कांदळवन झाडांची लागवड करून ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी रंगायतन येथे देशभक्ती आणि पर्यावरण यावर आधारीत एक सूर एक ताल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांमधील जवळपास ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या समारंभाला सभागृह नेते नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण, उपायुक्त संदीप माळवी, युवक बिरादरीच्या संचालिका स्वर क्रांती, युवक बिरादरीच्या ठाणे शाखेच्या प्रमुख संज्योत वढावकर आदी उपस्थित होते.